पिंपरी : महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा बोऱ्हाडेवाडी येथील विनायकनगर येथे उभारण्याचे काम सुरू होते. पायाचा चौथरा बांधण्यात आला असून ४० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आता पुतळ्याच्या जागेत बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे चौथरा उभारण्यासाठी केलेला पाच कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

बोऱ्हाडेवाडी येथील विनायकनगर येथे १४० फूट उंच छत्रपती संभाजी महाराज तसेच, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भव्य पुतळा उभारण्याचे नियोजन केले. त्याच्या चौथऱ्याच्या कामाची निविदा राबवून धनेश्वर कन्स्ट्रक्शन ठेकेदाराला सन २०२० मध्ये काम दिले. १२ कोटी ५० लाखांच्या या कामाची मुदत दीड वर्षे होती. वेळेत काम न झाल्याने ठेकेदाराला ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा बनविण्याचे काम दिल्ली येथे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार करीत आहेत.

हेही वाचा : राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर

मात्र, आमदार महेश लांडगे यांनी विनायकनगर येथे पुतळा न उभारता तो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मोशी सेक्टर क्रमांक पाच व आठ येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेशन केंद्राच्या (पीआयईसीसी) ठिकाणी उभारण्याची मागणी महापालिकेकडे केली. तसेच प्रदर्शन केंद्राच्या जागेत पुतळा उभारण्यासाठी जागेची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार पीएमआरडीएने अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या स्थळ बदलाच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे.

६० कोटींचा खर्च

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा कांस्य धातूचा पुतळा असणार आहे. त्यासाठी ३२ कोटी ६६ लाख खर्च अपेक्षित आहे. पुतळ्याच्या ४० फूट उंचीच्या चौथऱ्याचा खर्च १२ कोटी ५० लाख इतका आहे. तसेच, त्याठिकाणी संभाजी महाराज सृष्टी उभारून आकर्षक विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या स्मारकाचा एकूण खर्च ६० कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : पुण्यात लवकरच स्कायबस; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, दर्शनी भागात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी स्थळ बदलले आहे. मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र परिसरात हा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुणे-नाशिक महामार्गावरून तो स्पष्टपणे दिसेल. जुन्या ठिकाणी चौथऱ्याचे काम झाले आहे. तो खर्च वाया जाणार नाही. त्याठिकाणी दुसरे काही तरी करण्यात येईल.

हेही वाचा : ‘राष्ट्रवादी भवन’वरून दोन्ही गट आमने-सामने; अजित पवार गटाचा ताबा घेण्याचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही. परंतु, चौथरा बनविण्यासाठी आतापर्यंत पाच कोटी रुपये खर्च झाला आहे. आता ती जागा बदलून दुसऱ्या जागेत चौथरा केला जाईल. त्यामुळे वाया गेलेला पाच कोटी रुपयांचा खर्च संबंधित अभियंता, सल्लागार, ठेकेदारांकडून वसूल करावा.