लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : युद्धाच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. नुकसानकारक तंत्रज्ञान, अंतराळातील प्रगती, सायबर आणि माहिती क्षेत्र,पारंपारिक युद्धातील क्षमतांमधील प्रगतीमुळे युद्धक्षेत्र अधिक जटिल, स्पर्धात्मक आणि जीवघेणे होत आहे. उद्याच्या युद्धभूमीवर काम करण्यासाठी तांत्रिक क्षमता वाढवणे आवश्यक आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शुक्रवारी मांडले. तसेच तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा आणि व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचा शोध सुरू ठेवण्याचा सल्लाही त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) छात्रांना दिला.

एनडीएतील खेत्रपाल मैदानावर झालेल्या १४६व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनावेळी पांडे बोलत होते. पांडे यांनी संचलनाचे निरीक्षण करीत छात्रांकडून मानवंदना स्वीकारली. ‘एनडीए’चे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अजय कोचर, उपप्रमुख मेजर जनरल संजीव डोगरा या वेळी उपस्थित होते. या संचलनात १ हजार २६५ छात्रांनी संचलन केले. १४६व्या तुकडीतील १९९ छात्रांनी लष्कराचे, ३८ छात्रांनी नौदलाचे आणि १०० छात्रांनी वायूदलाचे प्रशिक्षण पूर्ण केले. मित्र राष्ट्रातील १९ छात्रांनीही त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. एकूण गुणवत्तेसाठी शोभित गुप्ता या छात्राने सुवर्णपदक पटकावले. मणिक तरुण या छात्राला रौप्य पदक, अन्नी नेहरा या छात्राला कांस्य पदकाने गौरवण्यात आले. गोल्फ स्क्वाड्रन संघाने प्रतिष्ठेचा चीफ ऑफ स्टाफ बॅनर मिळवण्याची कामगिरी केली.

आणखी वाचा-इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला

पांडे म्हणाले, की सातत्याने होत असलेल्या विकासाच्या अनुषंगाने लष्कराकडून विविध क्षेत्रात आवश्यक ते बदल केले जात आहेत. तांत्रिक प्रगती होत असली तरी युद्धभूमीवरील यंत्रामागे असलेला पुरुष किंवा महिला यांची महत्त्वाची भूमिका कायम राहणार आहे. एनडीएतील प्रशिक्षणादरम्यान नेतृत्त्वाच्या मूलभूत घटकांची ओळख करून देण्यात आली आहे. पुढील वाटचालीत नेतृत्त्वगुण अधिक विकसित करण्यावर लक्ष दिले पाहिजे. तसेच आव्हानात्मक परिस्थितीच्या दृष्टीने शारीरिक तंदुरुस्ती राखणेही महत्त्वाचे आहे. खरा नेता त्याच्या कृतींवर विश्वास कमवत असतो.

महिला छात्रांचे कौतुक

दीक्षांत संचलनात २४ महिला छात्रांच्या तुकडीचाही समावेश होता. या महिला छात्रांचे लष्करप्रमुखांनी कौतुक केले. महिला छात्रा नारीशक्ती आणि सर्वसमावेशक सशस्त्र दलांप्रती असलेली कटिबद्धता दर्शवतात, असे पांडे यांनी सांगितले.