पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार ७६४ नवे करोनाबाधित आढळले, तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २ हजार ७६ वर पोहचली आहे. आजअखेर २ हजार ४३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ८३० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत ८३ हजार ९१५ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी दिवसभरात १ हजार ५ करोनाबाधित आढळले असून २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८९१ जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५३ हजार २८९ वर पोहचली असून पैकी, ४२ हजार ३४९ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार ११० एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेचे आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात १९ हजार २१८ नवे करोनाबाधित आढळले. तर, ३७८ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८ लाख ६३ हजार ६२ वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुक्त झालेले ६ लाख २५ हजार ७७३ जण, २ लाख १० हजार ९७८ अॅक्टिव्ह केसेस आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या २५ हजार ९६४ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.