पुणे : ट्रकचालकाकडून पैसे उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. बापूराव पोपट ढोले असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ट्रकचालक राहुलकुमार शिवनाथ यादव (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) हा मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन १५ एप्रिल रोजी निघाला होता. त्या वेळी पोलीस कर्मचारी ढोले मोटारीतून निघाले होते. त्यांनी ट्रक अडवला आणि मोबाइलवर बोलत असल्याचा आरोप ट्रकचालक यादव याच्यावर केला. ढोले यांनी ट्रकचालकाकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा ट्रकचालक यादवने एवढे पैसे नाहीत. माझ्याकडे दहा हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी ट्रकचालक यादवला मोटारीतून खेड शिवापूर परिसरात नेले. तेथे त्याला धमकावून एका पेट्रोल पंपावर नेले.

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला ऑनलाइन पैसे रोख स्वरुपात देण्यास सांगितले. तेव्हा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने रोख पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर यादवला घेऊन ढोले एका दुकानात गेले. यादवने दुकानदाराला ऑनलाइन दहा हजार रुपये पेसे पाठविले. दुकानदाराकडून दहा हजार रुपये रोख स्वरुपात घेण्यात आले. त्यानंतर यादवने राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. राजगड पोलिसांनी ढोले यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ढोले यांनी माफी मागून ट्रकचालक यादवला दहा हजार रुपये परत केले. याबाबतचा अहवाल ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना पाठविण्यात आला. त्यांनी संबंधित अहवाल परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांना सादर केला. ढोले यांची चौकशी करण्यात आली. त्याच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्यचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त कदम यांनी दिले.

कारवाई न करण्यासाठी पैसे घेणारा उपनिरीक्षक निलंबित

हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर कारवाई न करण्यासाठी ९० हजार रुपये घेणाऱ्या काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद नवले असे निलंबित केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. महंमदवाडीतील एका हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लर प्रकरणी गुन्हे शाखा आणि काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली होती. याप्रकरणी हाॅटेलमालकाची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा उपनिरीक्षक नवले यांनी हुक्का पार्लरवर कारवाई करणार नाही. दरमहा ३० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून नवले यांनी ६० हजार रुपये घेतल्याचे चौकशीत उघड झाले होते.