पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी चौकशीचे सत्र सुरू आहे. आता रुग्णालयातील कैदी रुग्ण समितीचे अध्यक्ष डॉ. सुजित धिवारे यांनी हे पद नको असल्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, नियुक्तीनंतर महिनाभरातच त्यांनी तडकाफडकी पदावरून पायउतार होण्याची पावले उचलली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित पाटील याने पलायन करण्याच्या काही दिवस आधी २७ सप्टेंबरला कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. धिवारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षकही आहेत. त्यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे कैदी रुग्ण समितीचे अध्यक्षपद नको असल्याचे पत्र दिले आहे. मात्र अधिष्ठात्यांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.

हेही वाचा : पुणे : रेल्वे स्थानकावर आता स्वस्तात पाणी! पाच रुपयांत एक लीटर

ललित पाटील पलायनप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल २७ ऑक्टोबरला सादर केला. समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी हा अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे सोपवला आहे. त्यांच्याकडून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठविला जाणार आहे. दरम्यान, हे सचिव परदेश दौऱ्यावर असल्याने ३ नोव्हेंबरला हा अहवाल त्यांच्यासमोर सादर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : दिवाळीनिमित्त गावी जाताय? एसटीच्या जादा गाड्यांचे नियोजन जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कैदी रुग्ण समितीचे अध्यक्षपदी वरिष्ठ प्राध्यापकांकडे सोपवावे, अशी मागणी मी अधिष्ठात्यांकडे केली आहे. वरिष्ठ प्राध्यापक हे तज्ज्ञ असल्याने रुग्ण उपचारांबाबत अधिक योग्य निर्णय घेऊ शकतात. माझ्याकडे उपअधीक्षक पदाचा कार्यभार असल्याने त्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. त्यामुळे मला सदस्य म्हणून समितीत स्थान देण्याची मागणी केली आहे.” – डॉ. सुजित धिवारे, अध्यक्ष, कैदी रुग्ण समिती