पुणे : देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) स्वतंत्र प्लेसमेंट संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर सरकारी, खासगी कंपन्यांनी नोंदणी केली असून, कंपन्यांतील नोकऱ्यांची विद्यार्थ्यांना घरबसल्या माहिती मिळू शकणार आहे.

शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतल्याची माहिती एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी जूनमध्ये पुण्यात दिली होती. या पार्श्वभूमीवर एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीतारामन यांनी या संकेतस्थळाचे अनावरण केले. हे संकेतस्थळ आता एआयसीटीईच्या इंटर्नशीप संकेतस्थळाशीही जोडण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.

हेही वाचा : पुणे महामेट्रो करणार सर्वंकष वाहतूक आराखडा, निगडी ते हिंजवडी मेट्रो धावणार

डॉ. सीतारामन म्हणाले, की या संकेतस्थळाद्वारे ग्रामीण आणि आदिवासी भागातील अभियांत्रिकीसह अन्य तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी भटकावे लागणार नाही. या संकेतस्थळाद्वारे विद्यार्थी थेट हजारो बहुराष्ट्रीय कंपन्यांशी जोडले जातील. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर त्यांना त्यांच्या विषयाशी संबंधित नोकरीचे हजारो पर्याय उपलब्ध होतील. आतापर्यंत चार हजारहून अधिक कंपन्यांनी नोंदणीसाठी इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळे कंपन्यांना देशभरातील उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांतील उत्तम मनुष्यबळाचा शोध घेण्याचा सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणतात, मेट्रो स्थानकाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ प्रत्येकवेळी बंधनकारक नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समुपदेशन, मार्गदर्शनाचीही सुविधा

विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी अनुकुल अशा पद्धतीने संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान इंटरनेटची गरज भासणार नाही. नोकरी मिळण्यासह करिअर समुपदेशन, मुलाखतीसाठी मार्गदर्शन अशा सुविधाही संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.