पुणे : पुणे शहरातील मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या जागेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे विस्तारीकरण करण्यात यावे आणि राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीने हजारो भीमसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन समन्वयकांसोबत फोनवरून संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असल्याचे सांगून, स्मारकाच्या मागणीसाठी आंबेडकरी समाजाला पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही; तुमच्या मागणीनुसार निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिले होते.

मुरलीधर मोहोळ यांनी आश्वासन देऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी होऊन देखील प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे आज विविध संघटनांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीचे समन्वयक शैलेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्या वेळी शैलेंद्र मोरे म्हणाले, “मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सात दिवसांत प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. ते आश्वासन देऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्या पार्श्वभूमीवर आम्ही मुरलीधर मोहोळ यांना जाब विचारण्यासाठी आलो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही आमच्यासोबत खोटे बोलला आहात. आम्हाला लेखी उत्तर दिले जाईपर्यंत, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही,” असे त्यांनी सांगितले.