पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात आता गर्भवती आणि नवजात बालकांमधील आनुवंशिक आजारांचे निदान होणार असून, त्यांच्यावर उपचारही केले जाणार आहेत. आनुवंशिक आजारांवरील संशोधन आणि त्यावरील उपचारासाठी रुग्णालयात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन पिडियाट्रिक क्लिनिकल जेनिटिक्स’ विभाग सुरू झाला आहे. यामुळे गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या महागड्या तपासण्या अतिशय कमी दरात होणार आहेत.

‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन पिडियाट्रिक क्लिनिकल जेनिटिक्स’ यासाठी निवड झालेले ससून हे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत हा विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागातील निदान व उपचार बालरोग आणि प्रसूती विभागातर्फे देण्यात येणार आहेत. आनुवंशिक आजारांच्या तपासण्या महागड्या असल्याने अनेकांना त्या करणे शक्य होत नाही. ससून रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्याने अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे. या विभागात तपासण्या, आजारांचे निदान, उपचार, संशोधन या बरोबरच समुपदेशनही करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पुण्यात घरांच्या विक्रीला घरघर! ग्राहकांनी पाठ का फिरवली जाणून घ्या…

बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर म्हणाल्या की, आनुवंशिक आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये जातात. त्यामुळे आनुवंशिक आजारांचे योग्य वेळेत निदान आवश्यक असते. गर्भवतींमधील आनुवंशिक आजारांचे निदान झाल्यास औषधांव्दारे भविष्यातील धोके टाळता येतात. तसेच नवजात बालकांना असलेले आजारही यामुळे आधीच कळू शकतात. आनुवंशिक आजारांवरील उपचारांसाठी बालरोग विभागामध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. तिथे गर्भवती आणि बालकांची आनुवंशिक आजारांची तपासणी करण्यात येईल. हा बाह्यरुग्ण विभाग दर सोमवारी सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत सुरू राहणार आहे.

याविषयी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन पिडियाट्रिक क्लिनिकल जेनिटिक्स’ या विभागामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. शिवाजीनगर येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या जनुकीय आरोग्य प्रयोगळशाळेच्या माध्यमातून या विभागातील तपासण्या करण्यात येतील. यात सिकल सेल, जन्मजात हायपोथायरॉईडीझम, थॅलेसेमिया यांसह इतर सर्व आवश्यक तपासण्यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : पुणे : कटक मंडळाच्या रुग्णालयातील गच्चीवर मृतदेह सापडला

नवीन विभागाचा फायदा…

  • गर्भवतीसह बालकाला असलेल्या आनुवंशिक आजारांचे निदान
  • प्रसूतीपूर्वीच बाळाच्या आजाराचे निदान शक्य
  • खासगी रुग्णालयांपेक्षी कमी दरात तपासण्या
  • आनुवंशिक आजारांवर संशोधन
  • उपचारांची दिशा ठरविणे सोपे