पुणे : बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयात वारंवार गैरप्रकार घडत आहेत. मात्र, केवळ समित्या नेमण्याचा सोपस्कार केला जात आहे. या समित्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अहवाल सादर करून अनेक महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही त्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे केवळ चौकशीचा खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.

ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्य पार्टी केली होती. त्यावेळी काही मद्यधुंद डॉक्टरांनी निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. या प्रकरणी एका महिला डॉक्टरने तक्रार केली होती. या प्रकरणाची दखल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. त्यांनी ससूनमध्ये आयोजित कार्यक्रमात या पार्टीची छायाचित्रे दाखविली होती. यानंतर रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून जानेवारीअखेरीस अहवाल सादर केला. हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवूनही अद्याप कारवाई झालेली नाही.

हेही वाचा : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

ससूनमध्ये अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल रुग्णाला उंदराने चावा घेतल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला होता. ही घटना १ एप्रिलला घडली होती. या रुग्णाचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर केला. यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. रुग्णालयाच्या साफसफाईची जबाबदारी वैद्यकीय उपअधीक्षक सुजीत धिवारे यांच्याकडे होती. त्यामुळे या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने त्यांच्या स्तरावर सुजीत धिवारे यांचे पद काढून घेण्याची दिखाऊ कारवाई केली आहे.
बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रॅगिंगची तक्रार मार्च महिन्यात केली होती. या प्रकरणी चौकशी करून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावरील कारवाईही प्रलंबित आहे. याचबरोबर या महिन्यातही पदव्युत्तरच्या आणखी एका विद्यार्थिनीने रॅगिंगची तक्रार केली होती. याची चौकशी महाविद्यालयाच्या एका समितीकडून पूर्ण झाली असून, आता दुसऱ्या समितीकडून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड: महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना रावणी अहंकार; संजोग वाघेरेंचे बारणेंना प्रत्युत्तर

चौकशीचा फेरा

३१ डिसेंबर मद्य पार्टी

  • जानेवारी महिन्यात चौकशी समिती स्थापन
  • जानेवारीतच वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर
  • कारवाई प्रलंबित

रॅगिंग प्रकरण

  • मार्च महिन्यात चौकशी समिती स्थापन
  • मार्चमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर
  • कारवाई प्रलंबित

हेही वाचा : पुणे: रेल्वे प्रवाशांची रोजचीच लढाई! तिकीट असूनही गाडीत चढता येईना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उंदीर प्रकरण

  • एप्रिलमध्ये चौकशी समिती स्थापन
  • याच महिन्यात वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर
  • कारवाई प्रलंबित

ससूनमधील विविध चौकशी समित्यांचे अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर झाले आहेत. त्यातील ३१ डिसेंबरच्या प्रकरणावर कार्यवाही झालेली आहे. उंदीर प्रकरणाच्या अहवालाची तपासणी सुरू आहे. रॅगिंगप्रकरणी महाविद्यालयाकडून आणखी माहिती मागविण्यात आली आहे.

राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग