पुणे : सणासुदीच्या काळात वाहने खरेदीला प्राधान्य दिले जाते. यंदा पाडव्यानिमित्त गेल्या आठ दिवसांत पुण्यात ७ हजार ३३६ वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत तब्बल ८५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिलेल्या माहितीनुसार, यंदा पाडव्यानिमित्त एकूण ७ हजार ३३६ वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षी ७ हजार ७०६ वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यांची संख्या ४ हजार २२१ आहे. त्याखालोखाल २ हजार ३२६ मोटारींची नोंदणी झाली आहे. याचबरोबर २४५ मालमोटारी, २५७ रिक्षा, ४५ बस आणि १९० टॅक्सींची नोंदणी झाली आहे. तसेच, ५२ इतर वाहनांची नोंदणी झाली आहे.

हेही वाचा… पुणे : धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून

यंदा पाडव्यानिमित्त केवळ १३७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी पाडव्यानिमित्त १ हजार ४९ ई-वाहनांची नोंदणी झाली होती. त्यात यंदा ८५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यंदा ई-वाहनांमध्ये ८८ दुचाकी, ४६ मोटारी आणि ३ मालमोटारींचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकही ई-रिक्षा, ई-बस आणि ई-टॅक्सीची विक्री झाली नाही, असे आरटीओच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

हेही वाचा… भारताला कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट! जाणून घ्या कोणत्या कर्करोगाचा धोका वाढला…

सणासुदीच्या काळात वाहन खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे दरवर्षी पाडव्याच्या काळात वाहन विक्रीत वाढ होते. यंदा वाहन विक्रीत वाढ झालेली नाही, मात्र ई-वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी