पुणे : लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तसेच शहरात होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीची शोभा वाढविण्यामध्ये महत्वाची भूमिका ढोल- ताशा पथक बजाविते. या ढोल पथकांना सरावासाठी अधिकृतपणे जागा द्यावी, तसेच त्यांच्या वाद्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे. मागील वर्षी मुठेला आलेल्या पुरात पथकांची वाद्ये वाहून गेली होती, तसेच सरावासाठी जागा नसल्याने शहराच्या निवासी वस्त्यांमध्ये त्यांना सराव करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे ही मागणी केली आहे.

शहरातील युवकांनी गेल्या काही वर्षांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा चेहरामोहरा बदलला आहे. ढोल ताशा, झांज, लेझीम अशा खेळांना मिरवणुकीत वाव मिळतो आहे. त्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. गणेश उत्सवाच्या आधी महिनाभर ही पथके सराव करीत असतात. मात्र, सरावासाठी त्यांना जागा नसते. त्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये असलेल्या जागेत ते सराव करतात. परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे महापालिकेने नदीपात्रातील जागेत अधिकृतपणे गाळे तयार करावेत. तिथे या पथकांना जागा उपलब्ध करून द्यावी. वेळ ठरवून द्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आवश्यकता भासल्यास महापालिकेने यासाठी या ढोल ताशा पथकांकडून नाम मात्र शुल्क देखील घ्यावे. यामुळे या सर्व पथकांना अधिकृत जागा मिळेल. मागील वर्षी पुरामुळे अनेक पथकांची वाद्ये वाहून गेली. ढोल, ताशे महागडे असतात. ते खराब झाल्याने पथकांना ते नव्याने विकत घ्यावे लागले. ही बाब त्यांना न परवडणारी आहे. त्यामुळे त्यांची वाद्य ठेवण्यासाठी म्हणून महापालिका प्रशासन त्यांना शाळांच्या खोल्या उपलब्ध करून देऊ शकते, असेही तिवारी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.