पुणे : सातारा जिल्ह्यातील डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, डॉक्टर सेल आणि काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
डॉ. संपदा मुंडे यांना तातडीने न्याय मिळवून देण्याची; तसेच भाजपच्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करत लालमहल येथे हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान भाजपा राजवटीत महिलांवर वाढत्या अत्याचारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्यातील ‘सत्ताधाऱ्यांकडून महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. तरीही सरकार मूकदर्शकाची भूमिका घेत आहे,’ असा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘ बंगालमधील एका डॉक्टरच्या हत्येनंतर भाजपने देशभर आंदोलन केले;पण महाराष्ट्रातील डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूबाबत भाजपा नेते गप्प आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना क्लिन चिट देऊन अन्याय केला आहे. आम्ही या अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहू.’
डॉक्टर सेलचे डॉ. राहुल सावंत म्हणाले, ‘ डॉ. संपदा मुंडे या प्रामाणिकपणे कार्य करीत असताना शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर दबाव आणला गेला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा डॉक्टरी पेशामधील कोणीही सुरक्षित राहणार नाही.’
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संगनमताने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप काँग्रेस महिला आघाडीच्या प्राची दुधाणे यांनी केला. महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी पीडितेच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून महिलांविषयी असंवेदनशील भूमिका घेतली आहे. त्यांना त्वरीत पदावरून हटवावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
‘डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे,’ ‘भाजप सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणांनी लालमहालाचा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती करावी; तसेच इतर तपास विभागांच्या मार्फत याचा तपास करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा, अशी मागणीही आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये ॲड. अभय छाजेड, लता राजगुरू, प्राची दुधाणे, मेहबुब नदाफ, डॉ. सुलक्षणा जगताप, डॉ. स्नेहल पाडळे, अर्चना शहा, स्वाती शिंदे, राजश्री अडसूळ, अंजली सोलापूरे, गुलाम हुसेन खान, राजेंद्र भुतडा, अक्षय माने, रमेश सोनकांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
