पुणे : अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्रीरामभक्तांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून, देशभरातील बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये हा सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवला जाणार आहे. श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकराकडून सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे.
हेही वाचा : “…पण आम्ही महिला ‘मर्यादा पुरुषोत्तम राम’चं म्हणू”, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
देशभरातील भाविक या सोहळ्यासाठी अध्योध्यानगरीत पोहोचले आहेत. या सोहळ्याचे दूरचित्रवाणीवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांव्यतिरिक्त क्रिकेटचे सामनेही काही वेळा दाखवले जातात. मात्र आता अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचेही थेट प्रक्षेपण चित्रपटगृहांद्वारे केले जाणार आहे. त्यासाठीची तयारी चित्रपटगृह समूहांनी केली आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाइन तिकिटविक्री करण्यात येत आहे. पुण्यातील नऊ चित्रपटगृहांतील दहा पडद्यांवर, तर मुंबईतील जवळपास ४० चित्रपटगृहांमध्ये हा सोहळा सकाळी अकरा वाजल्यापासून दाखवला जाणार आहे.
हेही वाचा : कांदा, वांगी, गाजर स्वस्त; मागणी वाढल्याने टोमॅटो, मटारच्या दरात वाढ
सिटीप्राईड समूहाचे पुष्कराज चाफळकर म्हणाले, की श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे चित्रपटगृहांमध्ये थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यासाठीची तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील सहा चित्रपटगृहांतील प्रत्येकी एका पडद्यावर हा सोहळा दाखवण्याचे नियोजन आहे.