पुणे : शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणात पीडित मुली, मुख्याध्यापक फितूर झाल्यानंतर न्यायालयाने कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या शिक्षकाला तीन वर्ष साधा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी याबाबतचे आदेश दिले. दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लाग्णार असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी आदेशात म्हटले आहे.

रामेश्वर विलास राठोड (वय ३५, रा. खराडी) असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत हडपसर भागातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली होती. राठोड शाळेत कंत्राटी शिक्षक होता. पीडित मुली सहावीत होत्या. शाळेतील स्नेह संमेलनासाठी नृत्य शिकविण्याच्या बहाण्याने राठोडने मुलींना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखविली होती. याप्रकाराची माहिती कोणाला दिल्यास राठोडने धमकावले होते, अशी तक्रार मुलींनी केली होती. या प्रकाराची माहिती शाळेतील शिक्षकांना देण्यात आली. त्यानंतर याबाबतची मुस्कान या स्वयंसेवी संस्थेला कळविण्यात आली. याप्रकरणी राठोडविरुद्ध गु्न्हा दाखल झाला होता.

हेही वाचा : भिवंडीत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून; पुण्यातील सराईत अटकेत

या खटल्यात सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील ॲड. मारूती वाडेकर यांनी काम पाहिले. त्यांनी १५ साक्षीदार तपासले. त्यापैकी चार पीडित मुलींसह सात साक्षीदार फितुर झाले. ॲड. वाडेकर यांनी एका मुलीचा नोंदविलेला जबाब, तिचे पालक, एक विद्यार्थी, त्याचे पालक, दोन स्वयंसेवी आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने राठोडला शिक्षा सुनावली.

Story img Loader