पुणे : श्री रामनवमी उत्सवात उच्च क्षमतेचे ध्वनीवर्धक वापरून ध्वनीप्रदुषण केल्याप्रकरणी पोलिसांकडून अखिल भारती विद्यापीठ उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई राघुजी रुपनर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ध्वनीवर्धक वापराबाबत दिलेले सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश धुडाकाविणे, तसेच पर्यावरण (संरक्षण) ध्वनी प्रदुषण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारती विद्यापीठ श्री रामनवमी उत्सव समितीकडून रविवारी (६ एप्रिल) श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. भारती विद्यापीठ परिसरात क्षमतेपेक्षा जास्त ध्वनीवर्धक लावण्यात आले. उच्च क्षमेतेचे ध्वनीवर्धक वापरुन ध्वनीप्रदुषण केल्याप्रकरणी पोलिसांनी ध्वनीवर्धक यंत्रणा पुरवठादारांसह समितीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला ध्वनीवर्धक ठेवण्यासाठी लाकडी स्टेज बांधून रहदारीला अडथळा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पुजारी तपास करत आहेत.

मिरवणुकीत मोटार अंगावर घालण्याचा प्रयत्न

सिंहगड रस्त्यावरील धायर भागारी श्री रामनवमीनिमित्त रविवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत वाहतूक नियोजन करणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एका मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस शिपाई श्रावण शेवाळे यांनी याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धायरीतील मुक्ताई गार्डनजवळून रविवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी एकाने मोटार गर्दीत घातली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक नियोजन करणारे सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी मोटारचालकाला मोटार थांबविण्याचा इशारा केला. मोटारचालकाने मोटार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोटार अडवली. तेव्हा रस्त्याच्या मधोमध मोटार लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. मोटारचालकाने पोलिसांशी झटापट केली. मोटारचालक आणि त्याच्याबरोबर असलेला साथीदार पसार झाला. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत.