पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी कंपनीतील उच्चपदस्थ महिलेची सायबर चोरट्यांनी १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ५१ वर्ष महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, तक्रारदार खराडीतील एका खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्या कुटुंबीयांसोबत खराडी भागात राहायला आहेत. ८ मे रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. संदेशात मार्गा फिलिप या महिलेचे नाव होते. युरोपमधील एका कंपनीत गुंतवणूक सल्लागार असल्याची बतावणी तिने केली होती. गुंतवणूक केल्यास ६०० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तिने तक्रारदार महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर तिने एका समाजमाध्यमातील समुहात महिलेचा समावेश केला. या समुहात गुंतवणूक योजनांची माहिती होती. महिलेला एक लिंक पाठविण्यात आली. लिंकमध्ये महिलेने माहिती भरून दिली. सुरुवातीला महिलेने अकरा हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा केले. या गुंतवणुकीवर परतावा मिळाल्याचा संदेश पाठविण्यात आला.
परतावा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. तिने आणखी रक्कम गुंतविली. १३ जूनपर्यंत महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी १८ लाख रुपये जमा केले. महिलेने परताव्याची रक्कम तपासली. तेव्हा दोन कोटी २१ लाख रुपये परतावा मिळाल्याचे दिसून आले. महिलेने परताव्यापोटी मिळालेली रक्कम खात्यात जमा करावी, असा संदेश पाठविला. मात्र, तिला प्रतिसाद देण्यात आला नाही. परताव्याची रक्कम मिळवायची असेल, तर आणखी ३३ लाख रुपये जमा करावे लागतील, असे तिला सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सायबर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.