पुणे : पानशेत धरणातील सांडव्यावर थांबून सेल्फी काढणाऱ्या दोन बहिणी पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात भावाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय १८ रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. स्थानिक रहिवाशांनी तातडीने बचावकार्य सुरू केल्याने अनुसया बालाजी मनाळे आणि तिची बहीण मयुरी बचावल्या, अशी माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. ज्ञानेश्वर आणि त्याची बहीण अनुसया, मयुरी, तसेच मित्र-मैत्रिणींसोबत रविवारी पानशेत धरण परिसरात फिरायला आला होता. दुपारी तीनच्या सुमारास ज्ञानेश्वरसह मित्र-मैत्रिणी दुचाकीवरुन घरी निघाले.

हेही वाचा…विमान प्रवाशांचे हाल! पुणे विमानतळावर अडथळ्यांची शर्यत अन् सावळा गोंधळ

पानशेत धरणाच्या वीज निर्मिती केंद्राच्या परिसरातील पुलावरून ते निघाले होते. त्यावेळी धरणातील सांडव्यावर सर्वजण उतरले. पाण्यात उभे राहून अनुसया आणि मयूरी मोबाइलवर छायाचित्रे काढत होत्या. त्यावेळी अनुसयाचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. पाण्याला वेग असल्याने ती वाहून जात होती. तिला वाचविण्यासाठी मयुरी पाण्यात उतरली. पाण्याला वेग असल्याने मयुरी बुडाली. अनुसया आणि मयुरीला वाचविण्यासाठी भाऊ ज्ञानेश्वरने पाण्यात उतरला पाण्याला वेग असल्याने ज्ञानेश्वर बुडाला. ज्ञानेश्वरबरोबर असलेल्या मित्रमैत्रिणींनी मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. अनुसया आणि मयुरी यांना वाचविण्यात यश आले. मात्र, ज्ञानेश्वर पाण्याचा वेगात वाहून गेला. या घटनेची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला, अशी माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.