पुणे : पादचारी ज्येष्ठ महिलेकडील दागिने आणि रोकड ठेवलेली पिशवी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नीलायम चित्रपटगृहासमोर घडली. याप्रकरणी पसार झालेल्या चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला नीलायम चित्रपटगृह परिसरात एका सोसायटीत राहायला आहेत. त्या गुरुवारी (२६ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नीलायम चित्रपटगृहासमोरील गल्लीतून निघाल्या होत्या. त्यांच्या पिशवीत दागिने आणि रोकड असा ८५ हजार रुपयांचा ऐवज होता. चोरट्यांनी महिलेकडील पर्स हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. शहर परिसरात पादचारी महिलांकडील दागिने, तसेच मोबाइल संच हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.