पुणे : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याने एकाला दांडक्याने बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले असून, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

रामलोचन हुसेनी कोरी (वय ४६, रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत धीरज राम (वय २५) संतकुमार कोरी (वय २५, रा. ऊरूळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता, फुरसंगी) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी प्रेमलाल सुरतनाम कुमरे (वय २१), देवेस वसंत धुर्वे (वय २२), संजय पुल्स मसराम (वय २८), रणजीत प्रकाश जाधव (वय २०), सतीश भरत कुमरे (वय १८), विशाल मनाजी सरियाम (वय १८) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत संतकुमार कोरी (वय २५, सध्या रा. नारंग ट्रान्सपोर्ट, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतकुमार आणि रामलोचन हे मामा भाचे आहेत. रामलोचन, संतकुमार, धीरज हे मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत. आरोपी हे मध्यप्रदेशातील आहेत. ऊरळी कांचन परिसरातील गोदामात ते हमाली करतात. आरोपीं आणि संतकुमार, रामलोचन यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरुन वाद झाला होता. गुरूवारी (१० जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास रामलोचन हे बटाटा वेफर्स आणण्यासाठी दुकानात गेले होते. तेव्हा आरोपीमधील एकाला त्यांचा धक्का लागला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादानंतर आरोपींनी रामलोचन यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी संतकुमार राहत असलेल्याखोलीत शिरले.

आरोपींनी संतकुमार आणि धीरज यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत रामलोचन यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरकोळ वादातून खून, मारहाण

किरकोळ वादातून शहरात खून आणि बेदम मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मोटारीचा धक्का लागल्याने हडपसरमधील फुरसुंगी परिसरात मोटाराचालक व्यावसायिक तरुणाचा टोळक्याने कोयत्यानो वार करुन खून केला होता. बाणेर-पाषाण रस्त्यावर किरकोळ वादातून मोटारचालकाने एका दुचाकीस्वार तरुणीला मारहाण केल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात दुचाकी पुढे नेण्याच्या वादातून दुचाकीस्वार तरुणी आणि तिच्या आईला बेदम मारहाण करण्यात आली होती. रस्त्यावर झालेल्या वादातून खून आणि हाणामारीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत.