पुणे : अभियांत्रिकी, वैद्यकीयसह वाणिज्य शाखेच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांची स्पर्धा तीव्र असल्याने त्याची तयारी अकरावीपासूनच सुरू होत असून, नुसत्या कनिष्ठ महाविद्यालयांऐवजी शिकवणी वर्गाला जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल प्रचंड वाढला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठी स्पर्धा करणारे विद्यार्थी आता ‘हमखास यश’ मिळवून देणाऱ्या, पण फारशा प्रसिद्ध नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांशी जोडून घेतलेल्या शिकवणी वर्गांकडे वळत असल्याचे चित्र आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकीयसह वाणिज्य शाखेतील सनदी लेखापालासाठीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी अकरावीपासूनच प्रवेश परीक्षांची तयारी सुरू करतात. त्यासाठी ते खासगी शिकवणी वर्ग लावतात. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत खासगी शिकवणी वर्गांनी सांगितलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा पसंतिक्रम नोंदवून त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला जातो. बरेच शिकवणी वर्ग ‘इंटिग्रेटेड कोचिंग’च्या नावाखाली महाविद्यालयांशी असे ‘सामंजस्य’ करार करतात. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयाकडे पाठ फिरवून खासगी शिकवणी वर्गात उपस्थित राहतो. शिक्षण विभागाच्या नियमानुसार, विद्यार्थ्याची वार्षिक उपस्थिती ७५ टक्के असणे अनिवार्य असते. पण, खासगी शिकवणी वर्गाने केलेल्या ‘करारा’मुळे महाविद्यालयातील उपस्थितीची ‘काळजी’ घेतली जाते. विद्यार्थ्याला तेथे केवळ प्रात्यक्षिक परीक्षेला उपस्थित राहावे लागते. त्यामुळे आता नामांकित महाविद्यालयांप्रमाणेच नामांकित नसलेल्या महाविद्यालयांत प्रवेशालाही मागणी येऊ लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारे अकरावीचे प्रवेश होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : देहूत पोलिसांची करडी नजर; पालखी सोहळ्यात चोरट्यांवर असणार पोलिसांचं विशेष लक्ष; पोलीस आयुक्तांनी दिली भेट

‘इंटिग्रेटेड’ शिकवण्यांतून पालक विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण टाकतात. त्याचे फार वाईट परिणाम होतात. ‘जेईई’ची शिकवणी करून ‘सीईटी’चीही तयारी करण्याची भ्रामक कल्पना पालक-विद्यार्थ्यांची असते. त्यासाठी लाखो रुपये घालवले जातात. अकरावी-बारावीचा अभ्यासक्रम एका वर्षात संपवून उर्वरित वर्षभर प्रगत अभ्यासक्रम शिकवला जातो. उदाहरणार्थ, जेईई ॲडव्हान्स्डसाठी १२० धडे असतात, तर सीईटी आणि बारावीसाठी ८९ धडे असतात. अभ्यास झेपत नसल्याचे विद्यार्थ्यांना अकरावीच्या मध्यावर कळते. मात्र, ‘जेईई’च्या शिकवणीच्या प्रतिष्ठेला मुले बळी पडतात. त्यामुळे अकरावी-बारावीचे गुणही ढासळतात. त्याचाही मानसिक ताण मुुलांवर येतो,’ असे निरीक्षण ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांनी नोंदविले. अकरावीचे महत्त्व सध्या संपवले गेले आहे. पूर्वी ‘जेईई’पुरते मर्यादित असलेले ‘इंटिग्रेटेड’चे हे प्रकरण आता ‘नीट’ परीक्षा, काही प्रमाणात वाणिज्य शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्येही शिरकाव करते झाले आहे, संपवले गेले आहे.

हेही वाचा : आदिवासी विभागातील पदभरती प्रक्रिया स्थगित… झाले काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांचे दहावीनंतरचे महाविद्यालयीन जीवन हा प्रकारच आता राहिलेला नाही. त्यामुळे शाळेतून बाहेर पडल्यावर अकरावी-बारावीत होणारा भावनिक, सामाजिक विकास संपुष्टात आला आहे. प्रवेश परीक्षांसाठीच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने शिकवणी वर्गात शिकवले जाते. पण, अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांत तसे नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते. आता अकरावी-बारावीतील मजा संपून केवळ स्पर्धा राहिली आहे, असे करिअर समुपदेशक भूषण केळकर यांनी सांगितले.