पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत कोंढवा पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार पिस्तुले, सहा काडतुसे आणि दोन दुचाकी वाहने असा २ लाख ५८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. स्वप्नील दगडू भिलारे (वय २६,  रा. विठ्ठलवाडी, पौड), सलमान शेरखान मुलाणी (वय ३४  रा. खाटीक ओढा, पौंड) आणि आदित्य संदीप मत्रे (वय १९, भरेगाव, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

कोंढवा पोलीस १२ नोव्हेंबर रोजी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी चौघजण दोन दुचाकीवरून खडी मशीन चौकातून जात असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती हवालदार विशाल मेमाणे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, विशाल मेमाणे, सतीश चव्हाण, नीलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सुजित मदन, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपी स्वप्नील दगडू भिलारे याच्या कमरेला  देशी  पिस्टल मिळून आले. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली तीन पिस्तुले आणि काडतुसे जप्त केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त आर. राजा, पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे, रौफ शेख, लेखाजी शिंदे, सूरज शुक्ला, सागर भोसले, शाहिद शेख यांनी केली.

हेही वाचा : पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस दक्ष

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलीस दक्ष असून, ठिकठिकाणी पायी गस्ते, बीट मार्शलांची गस्त, हद्दीतील अवैध व्यवसायाविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषतः सराईत गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाई केली जात असून, त्यांची शोध मोहीम राबवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्याशिवाय अमली पदार्थ विक्रेते, शस्त्र बाळगणारे गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानुसाार गुन्हे शाखेचे अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांकडून कारवाई केली जात आहे.