आपला स्वतंत्र व्यवसाय असावा, असे स्वप्न प्रत्येक छोटा व्यावसायिक पाहतो. या स्वप्नांना आकार देऊन त्यांना प्रत्यक्षात आणण्याचे काम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातून होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षभरात पुणे जिल्ह्यात ५६३ जणांचे स्वयंउद्योजकतेचे स्वप्न साकार झाले आहे. यात सर्वाधिक प्रमाण दुग्ध व्यावसायिकांचे असले, तरी अगदी केश कर्तनालयापासून छायाप्रती काढणारे दुकान चालविणाराही आता स्वतंत्रपणे व्यवसाय करू लागला आहे. जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाकडून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. या कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ दिले जाते.
ग्रामीण व शहरी भागात गरजू आणि सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश यामागे आहे. या योजनेसाठी १८ वर्षांवरील कोणताही व्यक्ती पात्र ठरते. विशेष म्हणजे, यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. तसेच, बचत गटांचाही यात समावेश आहे. या योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योगाचे ५० लाख रुपयांपर्यंतचे आणि सेवा उद्योगाचे २० लाख रुपयांपर्यंतचे प्रकल्प करता येतात. यासाठी व्यावसायिकाला ५ ते १० टक्के गुंतवणूक करावी लागते आणि सरकारकडून २५ ते ३५ टक्के रक्कम अनुदान म्हणून मिळते. उरलेली रक्कम बँकेककडून पाच वर्षांच्या मुदतीसाठी कर्जरूपाने घेता येते.
पुणे जिल्ह्याचा विचार करता एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत या योजनेसाठी ५६३ जण पात्र ठरले. त्यात दुग्ध व्यावसायिकांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यांची संख्या २६४ आहे. म्हणजेच, निम्मे अर्जदार हे दुग्ध व्यावसायिक आहेत. त्या खालोखाल कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या ५८ आहे. स्वत:चा प्रवासी वाहतूक व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या ४७ आहे. याचबरोबर अभियांत्रिकी उत्पादनांचा व्यवसाय २२ जणांनी सुरू केला आहे. गेल्या वर्षी या योजनेतून उदबत्ती निर्मिती, फळ प्रक्रिया, कागदी कप बनविणे, कृषी पर्यटन, वाहन दुरुस्ती, केबल टीव्ही नेटवर्क, दातांचा दवाखाना, फ्लेक्स छपाई, पत्रावळी बनविणे, मोबाइल दुरुस्ती, हॉटेल, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय असे वेगवेगळे व्यवसाय सुरू झाले आहेत.
सरकारी अनुदानासाठी व्यवसाय सुरू करून नंतर बंद करणे, असे प्रकारही अनेक वेळा समोर येतात. हे टाळण्यासाठी व्यवसाय सुरू करून तो ३ वर्षे यशस्वीपणे चालविणाऱ्या व्यावसायिकास प्रोत्साहन देण्यात येते. या व्यावसायिकाला व्यवसाय विस्तारासाठी आणखी अनुदान आणि कर्ज उपलब्ध होते. याचबरोबर या व्यावसायिकासाठी प्रकल्पाची किंमत मर्यादा वाढते. प्रक्रिया उद्योगांसाठी ती १ कोटी रुपये आणि सेवा उद्योगांसाठी २५ लाख रुपयांवर जाते. त्यामुळे चांगल्या पद्धतीने व्यवसाय करणारा व्यावसायिक भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतो.
चौकट
व्यवसायाभिमुखतेकडे प्रवास
दैनंदिन जीवनात नागरिकांना लागणाऱ्या छोट्या गोष्टींची पूर्तता करणारे व्यवसाय या योजनेच्या माध्यमातून उभे राहात आहेत. हे व्यावसायिक त्यांचा छोटा व्यवसाय करीत असतात. परंतु, त्यांच्या व्यवसायाला व्यापक रूप या माध्यमातून मिळत आहे. याचबरोबर त्यांच्या व्यवसाय विस्तारामुळे इतरांना रोजगारही उपलब्ध होत आहे, अशी माहिती जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी सतीश खरात यांनी दिली.
sanjay.jadhav@expressindia.com