पुणे : विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेला प्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या आदेशापासून पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. वाहतुकीबाबत शहरात कार्यरत असलेले विविध विभाग, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची चर्चा करून, हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती केल्यानंतर एक जानेवारीपासून कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेल्या अशा दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले होते. आत्तापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये बदल करण्यात आला आहे. केवळ सहप्रवाशावर कारवाई करण्याची तरतूद त्यात करण्यात आल्याचे महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नमूद आहे. त्यानुसार काही ठिकाणी कारवाई देखील सुरू करण्यात आली होती. त्याला विविध स्तरांतून विरोध झाल्यामुळे याबाबत समाजातील विविध घटकांशी आणि प्रशासकीय यंत्रणांशी चर्चाकरून जानेवारी महिन्यात कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी दिली.

हेही वाचा : शहरातील टेकड्यांवरील सुरक्षेच्या उपाययोजना; पुणे पोलिसांकडून राज्य शासनाकडे सोमवारी अहवाल पाठविणार

पुण्यात हेल्मेटसक्ती लागू करण्यात येवू नये, या मागणीसाठी आमदार हेमंत रासने यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याने महामार्गांवरील दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांसाठी हे आदेश काढण्यात आल्याचे यावेळी आयुक्तांनी रासने यांना सांगितले.  

जनजागृतीवर भर

विना हेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही काही दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत नसल्याचे दिसून आले आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहनचालकांनी नियमित हेल्मेटचा वापर करावा, यासाठी आम्ही जनजागृती करण्यावर भर देणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. शहरात वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबात शहरातील विविध घटकांशी चर्चा करून आम्ही कारवाईसंदर्भात जानेवारीमध्ये निर्णय घेणार आहोत.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त