पुणे: दुर्धर आजारामुळे महिलेची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. तिचा पती मूत्रपिंडदाता म्हणून पुढे आला. मात्र, दोघांचा भिन्न रक्तगट आणि पतीच्या मूत्रपिंडाला एकाऐवजी तीन रक्तवाहिन्या जोडलेल्या असल्याने वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली. या गुंतागुंतीवर मात करीत डॉक्टरांच्या पथकाने या महिलेवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करीत तिला जीवदान दिले.

गृहिणी असलेल्या आरती मशाले यांना २०१५ पासून विविध प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी होत्या. त्यांना सिस्टमॅटिक ल्युपस एरिथेमाटोसस (एसएलई) या आजाराचे निदान झाले. हा एक ऑटोइम्युन आजार आहे. या आजारात रोगप्रतिकारकशक्ती शरीरातील अवयवांवरच हल्ला करते. या आजारामुळे त्यांची मूत्रपिंडे निकामी झाली. त्यातच त्यांना मधुमेहाचे निदान झाले. मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांना २०२३ पासून डायलिसिसवर ठेवण्यात आले होते.

हेही वाचा >>>हे यश माझ्या एकट्याचे नाही; ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे मत

आरती यांची प्रकृती खालावत असल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण आवश्यक होते. त्यामुळे त्यांचे पती राहुल मशाले (४३) यांनी एक मूत्रपिंड देण्याची तयारी दर्शवली. राहुल यांचा रक्तगट एबी, तर आरती यांचा रक्तगट ए होता. त्यामुळे ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. त्यातच पुढील तपासणीत राहुल यांच्या मूत्रपिंडाला एकाऐवजी तीन रक्तवाहिन्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ही शस्त्रक्रिया आणखी गुंतागुंतीची बनली. या सर्व गुंतागुंतीवर मात करीत बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील डॉ. तरुण जेलोका, डॉ. आनंद धारसकर आणि त्यांच्या पथकाने मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

शस्त्रक्रियेनंतर राहुल यांना सात, तर आरती यांना नऊ दिवसांनी घरी सोडण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर बरे होण्याचा कालावधी राहुल यांच्यासाठी २ ते ४ आठवडे आणि आरती यांच्यासाठी ६ ते १२ आठवडे आहे. आरती यांच्या आधीच्या आजारामुळे त्यांना प्रत्यारोपणाशी संबंधित औषधे आयुष्यभर घ्यावी लागणार आहेत. शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय पथकामध्ये डॉ. सौरभ खिस्ते, डॉ. श्रीरंग रानडे, डॉ. नीलेश वरवंतकर, डॉ. रणजित महेशगौरी यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. आशिष पाठक यांचा समावेश होता.

हेही वाचा >>>आरटीई प्रवेशांची मुदत संपली…जागा राहिल्या रिक्त… आता पुढे काय होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूत्रपिंड रक्तवाहिन्यांमुळे गुंतागुंत

राहुल मशाले यांच्या मूत्रपिंडाला एकाऐवजी तीन रक्तवाहिन्या जोडलेल्या होत्या. जगात सुमारे ६० टक्के जणांच्या मूत्रपिंडाला एक रक्तवाहिनी जोडलेली असते. दोन रक्तवाहिन्या जोडलेल्या व्यक्तींचे प्रमाण ३० टक्के, तर तीन रक्तवाहिन्या जोडलेल्या व्यक्तींचे प्रमाण १० टक्के असते. राहुल यांचे मूत्रपिंड आरती यांना प्रत्यारोपित करताना या तिन्ही रक्तवाहिन्या त्यांच्या महाधमनीशी जोडण्याचे आव्हान डॉक्टरांच्या पथकासमोर होते. यामुळे शस्त्रक्रिया गुंतागुंतीची बनली होती.