पुणे : शहरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. “व्हाॅट्सअॅप चॅटवर सतत का बोलते?” असे म्हणत राग मनात धरून पतीने दारूच्या नशेत पत्नीला गळफास देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पती विकी रमेश सोनवणे आणि सासरे रमेश तुकाराम सोनवणे यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी नेहमी सोशल मीडियाचे माध्यम असलेल्या व्हाॅट्सअॅपवर चॅटिंग करत असायची. हाच राग मनात धरून आरोपी पती विकी रमेश सोनवणे याने पत्नीच्या गळ्याला दोरीचा फास लावला आणि सिलिंग फॅनला दोरी बांधून पत्नीला खुर्चीवर उभा करत खुर्ची खाली ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा : पुण्यात गारवा वाढला, मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. गळ्याला गंभीर जखम असल्याने सध्या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आरोपी विकी रमेश सोनवणे हा लष्करात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी पती विकी रमेश सोनवणे आणि सासरे रमेश तुकाराम सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. व्हाॅट्सअॅप हे अत्यंत महत्त्वाचे साधन झाल्याने ते जपून वापरावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.