पुणे : फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावाला कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, बंद जलवाहिनीद्वारे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, त्याचा फटका सीरम इन्स्टिट्यूटला बसला आहे. कालव्यातून पाणी घेण्याचा करार जलसंपदा विभागाबरोबर असतानाही पाणी घेता येत नसल्याने महापालिकेने प्रतीदिन ३० लाख लीटर पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मांजरी, फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मुठा नवीन उजव्या कालव्यातून लष्कर जलकेंद्राजवळच्या कालव्यातून हे पाणी या गावांना दिले जात होते. या गावांसाठी प्रतिदिन २० दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, कालव्यातून पाणी सोडावे लागत असल्याने १५० दशलक्ष लीटर पाणी सोडावे लागत होते. त्यामुळे लष्कर जलकेंद्रातून जलवाहिनी टाकून या गावांना पाणी दिले जात आहे.

हेही वाचा : “माझ्या रक्तात काँग्रेस आहे, माझे तत्व अन् विचार…”, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर प्रणिती शिंदे स्पष्टच बोलल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यासंदर्भातील पत्र महापालिकेने जलसंपदा विभागाला दिले होते. त्यामुळे जलसंपदा विभागानेही कालव्यात सोडले जाणारे पाणी बंद केले आहे. त्याचा फटका सीरमला बसला आहे. जलसंपदाकडे कालव्यातून पाणी उचलण्याची परवानगी तसेच करार सीरमकडे आहे. लसींच्या निर्मिती कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याअभावी लसींच्या निर्मितीला फटका बसू शकतो म्हणूनच सीरमने पालिकेकडे पाण्याची मागणी केली आहे. वार्षिक ०.१३६८ दशलक्ष लीटर म्हणजेच दिवसाला ३० लाख लीटर पाण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.