पुणे : खासगी शिकवणी वर्गांना उपस्थित राहून कनिष्ठ महाविद्यालयांतील नियमित वर्गांकडे पाठ फिरवण्याच्या, तसेच कमी विद्यार्थीसंख्येच्या कनिष्ठ महाविद्यालयांशी साटेलोटे साधून शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची ‘परस्पर सोय’ लावण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्याची चाचपणी शिक्षण विभाग करत आहे.

राज्यात मुंबई-पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, लातूर अशा शहरांमध्ये नीट, जेईई, एमएचटी-सीईटी अशा प्रवेश परीक्षांची तयारी विद्यार्थी अकरावीपासूनच सुरू करतात. त्यासाठी विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गांना प्रवेश घेतात. काही शिकवणी वर्गांचे कनिष्ठ महाविद्यालयांशी ‘सामंजस्य’ असल्याने विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थिती परस्पर नोंदवली जाते. विद्यार्थी केवळ प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात जातात. त्यामुळे महाविद्यालयातील वर्गांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हे टाळण्यासाठी आता कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थितीची पद्धत अवलंबण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवण्याच्या सूचना या पूर्वीच देण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बायोमेट्रिक प्रणालीत फेस रेकग्निशन, बोटांचे ठसे आवश्यक असल्याने विद्यार्थी स्वतः वर्गात उपस्थित नसल्यास त्यांची उपस्थिती नोंदवली जाणार नाही. विद्यार्थ्याची ७५ टक्के उपस्थिती नोंदविली गेल्यासच तो राज्य मंडळाची परीक्षा देण्यास पात्र ठरेल. याबाबतचा धोरणात्मक निर्णय झाल्यास शिकवणी वर्गांवर नियंत्रण येईल,’ असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.