पुणे : कोंढव्यात एका दुकानदाराकडे ५० हजारांची खंडणी मागून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाचे कोंढव्यातील अश्रफनगर परिसरात दुकान आहे. आरोपी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुकानात आले. तरुणाकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. तरुणाने खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी दुकानातील टेबल, तसेच सीसीटीव्ही स्क्रीनची तोडफोड केली. तरुणाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी दुकानासमोर दहशत माजविली. त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी घाबरून त्यांची दुकाने बंद केली. आरोपी दुचाकीवरुन पसार झाले.

या घटनेनंतर फिर्यादी दुकानदाराच्या भावाने आरोपीशी संपर्क साधला. दुकानात तोडफोड का केली? अशी विचारणा केली. तेव्हा आरोपीने त्याच्याकडे ५० हजारांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास सर्वांना जिवे मारू, अशी धमकी त्याने दिली. पोलीस उपनिरीक्षक खोपडे तपास करत आहेत.

कोंढव्यातील मीठानगर भागात अल्पवयीनांमध्ये झालेल्या वादातून दहशत माजविण्यात आल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने मीठानगर भागातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या तीन रिक्षा आणि दोन मोटारींच्या काचा फोडल्या. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीनांचा एकाबरोबर वाद झाला होता. या वादातून टोळक्याने दहशत माजवून वाहनांच्या काचा फोडल्या. यापूर्वी कोंढवा परिसरात एका दुकानात शिरून टोळक्याने तोडफोड केल्याची घटना घडली होती.

लोणी काळभोरमध्ये वादातून तरुणाला मारहाण

लोणी काळभोर भागात जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपींनी जुन्या वादातून तरुणाला लोणी काळभोर परिसरात तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत. शहरात किरकोळ वादातून मारहाण, तसेच खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.