पुणे : कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामात आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाऊणतासात आग आटोक्यात आणली. पौड रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराजवळ मंडप साहित्याचे गोदाम आहे. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास गोदामात आग लागली.

गोदामात बांबू, कापड, सजावट साहित्य ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर सजावट साहित्याने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या कोथरुड केंद्राला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कोथरुड, एरंडवणे केंद्रातील पाच बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा…पुणे : नगर रस्त्यावरील बिवरी गावात दरोडा; महिलांना मारहाण करून १६ लाखांची लूट

केंद्रप्रमुख राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून अर्धा ते पाऊण तासात आग आटोक्यात आणली. आगीत सजावट साहित्य जळाले असून, आगीमागचे कारण समजू शकले नाही, असी माहिती अग्निशमन दलाने दिली.