पुणे : नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात असलेल्या बिवरी गावातील एका घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी महिलांना शस्त्राचा धाक दाखवून १६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली.

याबाबत प्रशांत विलास गोते (वय ४०, रा. बिवरी, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत गोते आणि कुटुंबीय मंगळवारी रात्री जेवण करून झोपले. मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास सात ते आठजण त्यांच्या घराजवळ आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. घराचा दरवाजाा कटावणीने उचकटण्यात आल्याने गोते कुटुंबीय झोपेतून जागे झाले. दरोडेखोर गोते कुटुंबीयांच्या घरात शिरले.

हेही वाचा…केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

गोते कुटुंबीयाला चाकू, तसेच तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविण्यात आला. दरोडखोरांनी शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील पाच लाखांची रोकड आणि दागिने काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी गोते कुटुंबातील महिलाच्या गळ्याला चाकू लावून गळा चिरण्याची धमकी दिली. अंगावरील दागिने काढून घेण्यात आले. दरोडेखोरांनी प्रशांत गोते यांच्या बहिणीला मारहाण केली. त्यांच्या आईला मारहाण केली, अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिली.

हेही वाचा…पुणे: आयटी हब हिंजवडीत फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा

मोबाइल संच फोडून चोरटे पसार

दरोडा टाकल्यानंतर चोरट्यांनी पसार होताना गोते कुटुंबातील सर्वांचे मोबाइल संच फोडले. पोलिसांशी संपर्क साधू नये म्हणून मोबाइल संच फोडण्यात आले. बिवरी गावात दरोडा पडल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यााठी लोणीकंद पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.