पुणे: भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू होती. परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे हे अपक्ष निवडणुक लढविणार आहेत. या सर्व घडामोडी दरम्यान भिवंडी लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, आज सकाळी पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानी शरद पवार यांची सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी भेट घेतली. त्यावेळी दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
हेही वाचा : खंडणीसाठी विमाननगरमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण
या भेटीनंतर सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत अनेक राजकीय घडामोडींबाबत भूमिका मांडली. तुमची उमेदवारी जाहीर होताच तुमच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. त्या प्रश्नावर सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा म्हणाले की, महाविकास आघाडीच्या वतीने माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे मी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचा आभारी आहे. त्यामुळे मी आज शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. माझी काल उमेदवारी जाहीर झाली आणि माझ्यावर दोन तासांत कारवाई करण्याचा प्रयत्न झाला. कपिल पाटलांनी हस्तक्षेप करुन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. १० वर्षांत त्यांनी दुसरं काय काम केलं आहे. एवढ्या वर्षांत त्यांना खासदारकी कळली नाही.पण मी एकच सांगू इच्छितो ते म्हणजे कपिल पाटील हे मतदारसंघात १०० टक्के अपयशी आणि निरूपयोगी खासदार असून मला उमेदवारी जाहीर झाल्याने माझ्यावर कपिल पाटील यांनी कारवाई केली आहे. यातून त्यांच्या पाया खालची वाळू सरकल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. दयानंद चोरगे हे अपक्ष लढविण्यावर ठाम आहेत. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, काँग्रेस आणि आमच्या पक्षाने लोकसभा मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. आमचा हा वाद कौटुंबिक वाद आहे. दयानंद चोरगे हे माझे छोटे बंधू आहेत. दोन दिवसांत सगळं काही ठीक होईल.