पुणे : दिवाळीत चोरट्यांनी उच्छाद मांडला. वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी दागिने, रोकड असा ४२ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई, कोथरूड, कात्रज-कोंढवा रस्ता, तसेच हडपसर भागात घरफोडीच्या घटना घडल्या. बिबवेवाडीतील लेकटाऊन सोसायटी भागातील एका प्रसिद्ध मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख २० हजारांची रोकड लांबविली.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेत मांडलेले दागिने, रोकड असा १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली. याबाबत एका व्यावसायिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा वाडेबोल्हाई-राहू रस्त्यावर बंगला आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोबर) सायंकाळी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी पूजा मांडली होती. प्रथेनुसार दुसऱ्या दिवशी पूजेतील ऐवज पुन्हा कपाटात ठेवण्यत येणार आहे. चोरट्यांनी मध्यरात्री स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला. देवघरात मांडलेल्या पूजेतील सोन्याचे दागिने आणि रोकड असा १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी व्यावसायिकाच्या बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.

कोथरूड भागात सदनिकेतून चोरट्यांनी आठ लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमधील लोकमान्य काॅलनीत एका सोसायटीत राहायला आहे. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून आठ लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लांबविला. लक्ष्मीपूजनाच्या पूजेत दागिने मांडण्यात येणार असल्याने महिलेने कपाटातील कप्पा उघडला. तेव्हा दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस कर्मचारी माळी तपास करत आहेत.

हडपसर भागातील अलकुंटे वस्ती परिसरात घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने कपाटातील नऊ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) घडली. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८० हजार रुपयांची रोकड लांबविली. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करत आहेत.

मिठाई विक्री दुकानातून रोकड चोरीला

बिबवेवाडीतील लेकटाऊन सोसायटी परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील दोन लाख २० हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाइल संच असा दोन लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.