पुणे : राज्यात दंगली होतील, हे प्रकाश आंबेडकर यांना कसे माहीत? अशी विचारणा केंद्रीय सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येथे केली. माहिती लपविणे गुन्हा आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबर नंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलीस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केला होता.
हेही वाचा : प्रवाशांना नेमकी विषबाधा कशामुळे? रेल्वेकडून कारणांचा शोध सुरु
केंद्र सरकारच्या योजनांची माहिती आणि लाभ पोहोचविण्यासाठी आयोजित भारत विकास संकल्प यात्रेवेळी राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आंबेडकर यांना अटक करण्याची मागणी केली. राजकीय महत्त्व संपलेले लोक असे बोलतात. दंगल होणार असेल तर त्याचा सबळ पुरावा द्यावा लागतो. दंगल कोण करणार ? कुठे होणार ? याची माहिती द्यावी लागते. आंबेडकरांना याची माहिती असेल तर माहिती लपविणे गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.