पुणे : मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचा विरोध करणारे सुनील शेळके यांनी यू- टर्न घेत मावळ लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे विधान केले आहे. मावळ लोकसभेची जागा आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी असा दावा देखील त्यांनी केला आहे. जोपर्यंत या जागेवर अधिकृतपणे उमेदवार दिला जात नाही, तोपर्यंत आमची हीच भूमिका असणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आमदार सुनील शेळके हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : “बारामतीची जागा महायुती जिंकणारच!”, आमदार गोपीचंद पडळकरांना विश्वास

सुनील शेळके म्हणाले, मावळ लोकसभेच्या जागेवर आजही आमचा दावा आहे. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी असं आमचं म्हणणं आहे. महायुतीकडून अधिकृत उमेदवार जाहीर होत नाही. तोपर्यंत मी माझ्या पक्षाची भूमिका मांडणारच असं शेळके म्हणाले. पुढे ते म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. याकरिता आम्ही मावळ लोकसभेच्या जागेसाठी आग्रही आहोत. मात्र, अजित पवारांनी दिलेल्या आदेशाच स्वागत करून आम्ही महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार असून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं शेळके यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत गेल्या चार महिन्यापासून मी भूमिका मांडत आहे. त्यामुळे मी कुठेही यु- टर्न घेतला नाही. मी माझे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भूमिका नेत्यांपर्यंत मांडत होतो, असंही शेळके म्हणाले.