पुणे : ‘देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा २२ ते २४ टक्के झाला, तरच देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होऊ शकते. कृषी क्षेत्राचा विकास होत नाही, तोपर्यंत देश विकसित होणार नाही,’ असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘पर्यायी इंधनाला चालना देऊनही देशातील जीवाश्म इंधनाची आयात वाढतच असून, देशाची जीवाश्म इंधन आयात शून्य होईल तो देशासाठी मोठा दिवस असेल,’ असेही त्यांनी नमूद केले.
जैवइंधन दिनानिमित्त प्राज इंडस्ट्रीतर्फे आयोजित ‘बायोव्हर्स’ कार्यक्रमात गडकरी बोलत होते. प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, किर्लोस्कर ब्रदर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय किर्लोस्कर, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे विक्रम गुलाटी, हीरो मोटोकॉर्पचे विक्रम कसबेकर, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, अतुल मुळे या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात डॉ. चौधरी यांच्या ‘होरायझन बियाँड ड्रीम्स : अज इज व्हॉट इज’ या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
देशात २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करावे लागत असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, ‘देशात ४० टक्के प्रदूषण वाहनांमुळे होते. देशात लोकसंख्या आणि वाहने सातत्याने वाढतच आहेत. प्रदूषणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने पर्यायी इंधनाचा वापर महत्त्वाचा आहे. इथेनॉलमुळे मक्याच्या उत्पादनात, दरांमध्ये वाढ झाली. ऊस उत्पादकांनाही पैसा मिळू लागला. टाकाऊ शेतमालापासून जैवसीएनजी तयार होऊ लागल्याने टाकाऊ शेतमालालाही किंमत आली आहे. पर्यायी इंधनाला चालना देण्यासाठी पुणे-मुंबईसह देशातील महामार्गांवर हायड्रोजनवर आधारित ट्रक चालवण्याचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जैवइंधनाचा पैसा देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत गेल्यास गावे ‘स्मार्ट’ होतील.’
नागरिकांना ‘एनएचएआय’च्या रोख्यांवर ८.५ टक्के व्याज मिळणार आहे. दर महिन्याला व्याजाची रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे. अनेक नवे रस्ते बांधले जाणार असल्याने वाहनोद्योगही पैसे कमावणार आहे,’ अशी टिप्पणी गडकरी यांनी केली.देशात पडीक असलेल्या १७ टक्के जमिनीवर बांबू लागवड केली पाहिजे. बांबू कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतो. बांबूचे उष्मांक मूल्य हे कोळशापेक्षा अधिक आहे. त्यापासून इथेनॉल तयार करता येते. त्यामुळे भविष्यात उसाच्या किमतीत बांबू विकला जाईल, असेही गडकरी यांनी नमूद केले.
‘गडकरी यांनी जैवइंधनाला प्रोत्साहन दिले. त्यातूनच आजवरची वाटचाल घडली. ‘बायोव्हर्स’ ही चळवळ आता पुढील पाऊल ठरणार आहे. विकसित भारताकडे जाताना शाश्वततेला प्राधान्य देऊन जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व भागीदारांनी एकत्र येऊन नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे,’ असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.