पुणे : मोहजालात (हनीट्रॅप) अडकवून एका ज्येष्ठाला लुटणाऱ्या टोळीत पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सामील झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक पसार झाला आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ मारुती उभे (वय ५५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहजालात अडकवून ज्येष्ठाला लुटल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अवंतिका सचिन सोनवणे (वय ३५), पूनम संजय पाटील (वय ४०), आरती संजय गायकवाड (वय ५८, तिघी रा. कोथरुड) यांना अटक करण्यात आली. पूनम पाटीलविरुद्ध काेल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका डाॅक्टरला ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग; २३२ मिलिमीटर पावसाची नोंद, गेल्यावर्षीच्या एकूण पावसाचा रेकॉर्ड तुटणार

या टोळीने अनेकांना मोहजालात अडकवून लुटल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. कोथरुड भागाातील एका ज्येष्ठाला मोहजालात अडकवून महिलेने एका हाॅटेलमध्ये नेले. त्यानंतर पोलीस आणि महिला हक्क आयोगाचे सदस्य असल्याचे सांगून ज्येष्ठाला मारहाण करण्यात आली. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याच्याकडील २० हजारांची रोकड मोबाइल संच काढून घेण्यात आला. २९ जुलै रोजी लक्ष्मी रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी तीन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

हेही वाचा : कांद्यावरील निर्यात निर्बंधाने उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी; जागतिक बाजारात देशाची पीछेहाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा लागला छडा…

याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांनी सुरु केला. लक्ष्मी रस्त्यावरील हाॅटेलमध्ये महिलेने आधारकार्ड दिले होते. पोलिसांनी तपास करून अवंतिका सोनवणेसह, पूनम पाटील, आरती गायकवाड यांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही चित्रीकरणात एक मोटार आढळून आली. तेव्हा मोटार मुळशीतील एकाच्या नावावर असल्याचे समजले. चौकशीत मोटारीचा वापर पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ उभे करत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी उभे याला ताब्यात घेतले. उभे या कटात सामील असल्याचे उघडकीस आले आहे. हाॅटेलमधील खोलीत महिला हक्क आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून प्रवेश करणाऱ्या महिलांसोबत उभे असल्याची माहिती तपासात मिळाली.