पुणे : भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष नाही. भाजपकडून केवळ राजकीय फायद्यासाठी हिंदुत्वाचा वापर केला जात असल्याची टीका हिंदू महासभेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आली. राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हिंदू महासभा समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढवणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

हिंदू महासभेच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनानिमित्त टिळक भक्तांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात महासभेच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली. त्या वेळी भोगले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेला हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता दत्तात्रय सणस, उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, प्रमुख कार्यवाह महेश सावंत पटेल, हरीश शेलार, राजू तोरसकर, तिलोत्तमा खानविलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. याच कार्यक्रमात पुण्यातील हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.

भोगले म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाने केवळ राजकीय फायद्यासाठी हिंदुत्वाचा आणि हिंदूंच्या धर्म भावनेचा वापर केला. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आणि आपली ठरावीक राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपने नेहमी हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षातील भ्रष्ट नेत्यांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला जातो. त्यातूनच भाजपकडे हिंदुत्वाचा विचार नसल्याचे स्पष्ट होते.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला आहे. त्यामागे सर्वसामान्यांच्या कल्याणाचा हेतू आहे. सध्या देशात आणि राज्यात अराजकता असलेली दिसते. सगळीकडे महागाईचे साम्राज्य आहे. सामान्य माणसाचे जगणे अवघड झाले आहे. राजकीय पक्षांची परिस्थितीही वाईट आहे. ईडी-सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून विरोधकांना संपविण्याचा, विरोधातला आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. एक प्रकारे अघोषित आणीबाणीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात कोणत्याही राजकीय पक्षावर जनतेचा विश्वास नसल्याचे दिसते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला पर्याय देण्यासाठी हिंदू महासभेने समविचारी पक्षांना, संघटनांना बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे,’ असेही भोगले यांनी सांगितले.

‘मुंबईसारख्या महानगरात भयमुक्त वातावरण निर्माण करणे, नागरी समस्या सोडवणे, उद्योगधंद्यांचे स्थलांतर रोखणे, वीज-पाणी-शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारणे, हिंदूंच्या हिताबरोबरच सामाजिक भान ठेवून विकासकामे करण्यासाठी हिंदू महासभेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे,’ असे सणस यांनी सांगितले.