पुणे : ‘संगीत ही माझ्यासाठी फक्त कला नाही; तर श्वास आणि साधनादेखील आहे,’ अशी भावना प्रसिद्ध तबलावादक पं. रामदास पळसुले यांनी शनिवारी व्यक्त केली. ‘संगीताचा हा अनमोल वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा अथक प्रयत्न करत राहीन,’ अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या वतीने ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर आणि प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते रामदास पळसुले यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी पळसुले बोलत होते. तात्यासाहेब नातू फाउंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू, गानवर्धनचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, सचिव डॉ. वासंती ब्रह्मे आदी या वेळी उपस्थित होते.
पळसुले म्हणाले, ‘डॉ. प्रभा अत्रे या शास्त्रशुद्धता, साधना आणि नवनिर्मितीचा संगम असलेल्या महान कलाकार होत्या. त्या संशोधक, लेखिका आणि प्रभावी गुरू होत्या. भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अखंडितपणे कार्य केले. त्यांच्या गायनातील ऊर्जा आजही रसिकांना आनंद आणि प्रेरणा देत आहे.’
पोहनकर म्हणाले, ‘डॉ. प्रभा अत्रे आणि माझा पन्नास वर्षांहून अधिक काळाचा अनुबंध होता. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी आपल्या प्रत्येक शिष्यावर पुत्रवत प्रेम करून त्यांना संस्कारित केले आहे.’
उत्तरार्धात निनाद दैठणकर यांचे संतूरवादन आणि आरती ठाकूर-कुंडलकर यांचे गायन झाले.