पुणे : शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठ, नारायण पेठ ते डेक्कन जिमखाना परिसराला जोडणारा भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

मेट्रोच्या कामासाठी हा पूल ९ सप्टेंबरपासून एक महिन्यासाठी बंद करण्यात आला आहे. त्याची मुदत १० ऑक्टोबर रोजी संपणार आहे. आता मेट्रोला मुदतवाढ न देता येत्या शनिवारपासून (११ ऑक्टोबर ) किमान दिवाळी संपेपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आणि महापालिका प्रशासनाने केली आहे.

मेट्रोच्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुणे महापालिका, वाहतूक पोलीस, मेट्रो प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेत वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात पेठांच्या परिसरात खरेदीसाठी येतात. त्यामुळे या काळात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पूल दिवाळीच्या काळात वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

दरम्यान, मेट्रोच्या कामासाठी हा पूल २१ एप्रिल पासून ४५ दिवसांकरता बंद करण्यात आला होता. हे काम जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, त्या कामाला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देऊन हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्या मुदतीमध्येही काम पूर्ण न झाल्याने गणेशोत्सवात १५ दिवस मेट्रोचे काम थांबवून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर ९ सप्टेंबरपासून हा पूल एक महिन्यासाठी बंद करण्यात आला. त्याची मुदत १० ऑक्टोबर रोजी संपणार आहे.