पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यांपासून दररोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान लोकसभा निवडणुकीला काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना अजित पवार, सुनेत्रा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात दौरे आणि मेळावे घेत आहेत. यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असे जवळपास निश्चित मानले जात आहे. यावरून राजकीय वातावरण तापले असून सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदार संघातून किमान दोन लाख मतांनी निवडून येतील असा अंदाज भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : “लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकरांना देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्तेच खूप झाले”, भाजपचे माजी खासदार संजय काकडेंचे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी संजय काकडे म्हणाले की, मागील ५० वर्षांपासुन बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न करत आहोत, भाजप किंवा घटक पक्षाने एकदा तरी बारामती जिंकायची असा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याकडून २०१४ च्या निवडणुकीत दुर्लक्ष झाल्याने आमची जागा ५७ हजार मतांनी पडली. तर २०१९ च्या निवडणुकीत दीड लाख मतांनी आमची जागा पडली. मात्र आता भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला असून त्यामध्ये पवार नावाची व्यक्ती आहे. त्यामुळे एक निश्चित ताकद वाढली आहे. एकूणच सुनेत्रा पवार या किमान दोन लाख मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्‍या इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला आणि भोर या विधानसभा मतदार संघात नेते, कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहिले नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचं पारडं जड असल्याचेही काकडे यांनी म्हटले आहे.