पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि ‘शिवचरित्र’कार गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते अविवाहित होते. भारत इतिहास संशोधक मंडळ येथे गुरुवारी (१८ सप्टेंबर) सकाळी अकरा वाजता मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर एक वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ग. ह. खरे यांची परंपरा वर्धिष्णू करणाऱ्या मेहेंदळे यांनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ इतिहास संशोधन कार्याला वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. ते क्रियाशील संशोधक होते. फारसी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन विविध भाषांसह मोडी लिपीवर त्यांचे प्रभुत्व होते.
मेहेंदळे सध्या इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधनपर लेखन करत होते. १९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता. ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांसह इतिहासातील लिप्यांचा अभ्यास होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच विविध संस्थांशी निकटचा संबंध होता. सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होते, ज्याची सुमारे पाच हजार पाने लिहून प्रकाशित होण्यासाठी तयार झालेली आहेत.
शिवचरित्र हा विषय १९६९ मध्ये त्यांनी अभ्यासाला घेतला तेव्हापासून अखेरचा श्वास घेईपर्यंत अखंडपणे त्यांचा हा ज्ञानयज्ञ सुरू होता. त्यातून आजवर त्यांनी दोन मराठी व एक इंग्रजी भाषेतील संशोधनपर ग्रंथ सिद्ध केले. त्यांनी मराठीत लिहिलेले शिवचरित्र दोन खंडांत प्रकाशित झाले आहे. ‘शिवछत्रपतींचे आरमार’ हा आणखी एक मराठी ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. त्यांनी इंग्रजी भाषेतूनही एक शिवचरित्र लिहिले आहे. त्यात शिवपूर्वकाळापासून ते शिवरायांच्या मृत्यूपर्यंत पूर्ण इतिहास आला आहे.
गजानन मेहेंदळे यांची ग्रंथसंपदा
- शिवचरित्र (खंड १) आणि (खंड २)
- शिवाजी झाला नसता तर
- टिपू ॲज ही रिअली वॉज,
- शिवाजी लाईफ अँड टाईम
- मराठ्यांचे आरमार