पुणे : पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव आता केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर या मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार आहे. या मार्गाच्या कामाला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.

स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव महामेट्रोने राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने त्याला मंजुरी देऊन तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. दिल्लीत सार्वजनिक गुंतवणूक मंडळासोर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (ता. १८) हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. अंतिम मंजुरीनंतर या मार्गाचे काम सुरू होईल, असे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : पिंपरी: अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सुनावले खडेबोल! पत्रकारांना अडवू…

महामेट्रोने या मार्गासाठी रचना सल्लागार नेमण्यासाठी निविदा डिसेंबर महिन्यात काढली. त्यात मार्गाची उभारणी, बोगद्यातील पर्यावरण नियंत्रण यंत्रणा, इमारतीची व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानकांची रचना यांची जबाबदारी रचना सल्लागाराकडे असणार आहे. ही निविदा मेट्रो मार्गाला मंजुरी मिळण्याआधीच काढण्यात आली असल्याने मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने या मार्गाचे काम सुरू करता येणार आहे. मंजुरीनंतर रचना सल्लागार नेमण्याच्या प्रक्रियेचा वेळ यामुळे वाचणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याची पोलिसांनी काढली धिंड

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग

  • संपूर्ण भुयारी मार्ग
  • खर्च – ३ हजार ६६३ कोटी रुपये
  • अंतर : ५.४ किलोमीटर
  • स्थानके : मार्केट यार्ड, पद्मावती, कात्रज