पुणे : मानाची पालखी, फुलांची उधळण आणि मिरवणूक असे दृश्य सण-उत्सवांना पाहावयास मिळते. मात्र, इतिहास प्रेमी घडविणारे पुण्यातील रमणबाग शाळेतील शिक्षक मोहन शेटे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकाची चक्क पालखीतून मिरवणूक काढली. फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह अशा वातावरणात हा आगळावेगळा सोहळा पार पडला.
रमणबागीय परिवारतर्फे प्रशालेतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोहन शेटे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर आणि इतिहास अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते मोहन शेटे यांचा सन्मानपत्र, छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गौरी शेटे या वेळी व्यासपीठावर होत्या.
हेही वाचा… ‘पांचजन्य वेणू’मध्ये केशव वेणूसह तीन बासऱ्यांचा मिलाफ
डॉ. देगलूरकर म्हणाले, की आयुष्याला आपल्या कार्यातून अर्थ प्राप्त करून देण्याचे काम शेटे सरांनी आपल्या शैक्षणिक, सामाजिक कार्यातून करुन दाखविले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना पालखीचा मान दिला, ही त्यांच्या कार्याची पावती आहे. आपुलकी व प्रोत्साहन देऊन विद्यार्थी घडवावे लागतात.
प्रा. घाणेकर म्हणाले, की मोहन शेटे हे इतिहास शिकविण्यासोबतच इतिहास घडविणारे शिक्षक आहेत. पुणे शहरात सुरु झालेल्या वारसा सहलींमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. आपल्या व्याख्यानांतून मोहन शेटे यांनी सर्वांपर्यंत इतिहास पोहोचविण्यासोबत लेखनही करावे.
हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमधून अपहरण झालेल्या व्यक्तीची बीडमधून सुटका
शेटे म्हणाले, की विद्यार्थ्यांचे प्रेम ही शिक्षकाची श्रीमंती असते. रमणबागेचा विद्यार्थी असल्याने माझ्यावर देखील इथलेच संस्कार झाले आहेत. पुस्तके आणि विद्यार्थी ही दोन प्रकारची ग्रंथालये शाळेमध्ये असतात. मी पुस्तकांप्रमाणे विद्यार्थ्यांची मने देखील वाचत गेलो, त्यामुळे मला संपन्न होता आले.
या वेळी दाखवण्यात आलेल्या चित्रफीतीत पांडुरंग बलकवडे, राहूल सोलापूरकर, गिरीश कुलकर्णी, चिंतामणी चितळे, भूषण हर्षे यांनी शेटे यांचे विविध पैलू उलगडून दाखवले. अॅड. अभिजित देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.