पुणे : हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रोमध्ये अत्याधुनिक ‘थर्ड रेल सिस्टिम’चा वापर केला जाणार आहे. ‘थर्ड रेल’ प्रणालीचा अवलंब केल्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोला रुळांच्या शेजारून आणि खालून विद्युतपुरवठा केला जाईल. या संपूर्ण मार्गावर कुठेही गाडीच्या बाजूने किंवा डोक्यावर इलेक्ट्रिकच्या खांबांचे किंवा तारांचे जाळे दिसून येणार नाही.
पुणेरी मेट्रो हा पुणे शहराला अत्याधुनिक अशी ‘थर्ड रेल’ प्रणाली उपलब्ध करून देणारा पहिला प्रकल्प ठरणार आहे. अखंडित विद्युत पुरवठ्याच्या जोडीला ‘थर्ड रेल’ प्रणालीचा आणखी एक फायदा म्हणजे मेट्रो गाडीच्या बाजूला किंवा डोक्यावर खांब तसेच विद्युतवाहक तारा नसल्याने दृष्टीसौंदर्यात बाधा येत नाही. पारंपरिक ओव्हरहेड उपकरण प्रणालींपेक्षा हे तंत्रज्ञान वेगळे असून, पक्षी किंवा पतंग तारांमध्ये अडकून मेट्रोच्या विद्युतपुरवठ्याला होऊ शकणाऱ्या संभाव्य अडथळ्याला या प्रणालीमध्ये वाव राहत नाही, अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.
हेही वाचा : चंद्रकांत पाटील यांचे राजकीय वजन घटले? कोथरुडमध्ये इच्छुकांच्या आशा पल्लवित
‘थर्ड रेल’ प्रणाली म्हणजे काय?
‘थर्ड रेल सिस्टीम’ला लाइव्ह रेल, इलेक्ट्रिक रेल किंवा कंडक्टर रेल असेही म्हटले जाते. ही एक अर्ध-सतत कंडक्टरद्वारे मेट्रो गाडीला विद्युत पुरवठा करण्याची अत्याधुनिक पद्धत आहे. ती मेट्रो रुळावर धावत्या दोन्ही बाजूने समांतर किंवा रुळांच्या मध्ये बसवली जाते. या प्रणालीच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा केला जातो.
हेही वाचा : पुणे: माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार
‘थर्ड रेल’ प्रणालीचे कार्य कसे चालते?
‘थर्ड रेल’ प्रणालीमध्ये मेट्रोच्या नियमित दोन रुळांच्या समांतर तिसरा विशिष्ट पिवळ्या रंगाचे पट्टे मारलेला एकेरी रूळ टाकून, त्या मेट्रो गाडीला थेट खालून ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्शन पॉवर’ पुरविली जाते. या पद्धतीने धावणाऱ्या गाड्यांना खालच्या बाजूला विद्युत संपर्कासाठी एक खास धातूची पेटी बसवण्यात येते, तिला ‘शूज’ असे म्हटले जाते. या शूजच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा होतो.