पुणे : राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त आणि शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नुकताच गुन्हा दाखल केला. सुपे यांच्या मालमत्तेची एसीबीकडून पु्न्हा चौकशी करण्यात आली. चौकशीत सुपे यांच्याकडे तीन कोटी ९५ लाख ३५ हजार ७९५ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात सुपे यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी पुणे पोलिसांना सुपे यांच्याकडे तीन कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपयांची मालमत्ता आढळून आली होती.
बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सुपे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीच्या पथकाने सुपे यांच्या मालमत्तेची पुन्हा चौकशी केली. त्यांची घरझडती घेण्यात आली. चौकशीत सुपे यांच्याकडे नव्याने तीन कोटी ९५ लाख ३५ हजार ९९५ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.
हेही वाचा : पुणे : शंभर वर्षांचा लक्ष्मी रस्ता येत्या सोमवारी फक्त पादचाऱ्यांसाठी!
सुपे यांचा पिंपळे गुरव परिसरातील गांगार्डेनगर येथे कल्पतरु बंगला असल्याचे चौकशीत उघडकीस आले. आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथे सुपे यांची साई दर्शन इमारत आहे. पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात श्री दत्त कृपा तीन मजली इमारत आहे. तुकाराम सुपे, त्यांची पत्नी कल्पना, मुलगी कोमल, मुलगा तुषार यांच्या नावावर भोसरी येथील नंदनवन काॅलनीत इमारत आहे. नाशिकमधील वडाळा विहार इमारतीत सुपे यांची सदनिका असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. सुपे यांची पत्नी कल्पना यांच्या नावावर ठाणे जिल्ह्रयातील कल्याण परिसरात खडकापाडा येथील अल्पेश अपार्टमेंटमध्ये एक सदनिका आहे. मुरबाड तालुक्यातील पाटगाव येथे सुपे यांनी पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली आहे.