पुणे : वैमनस्यातून टोळक्याने दोन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यश खंडू कांबळे (वय २३, रा. ग्रीन हिल पार्क सोसायटी, जैन मंदिराजवळ, कात्रज), सार्थक उर्फ ओम नितीन पंडीत (रा. अटल चाळ, कात्रज) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ओंकार सुनील ढेबे, अनुज शिवराज लोखंडे, अमन जाफर शेख, रामेश्वर जाधव, आदित्य जालिंदर शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यश कांबळे याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश कांबळे आणि त्याचा मित्र सार्थक पंडीत शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरुन कात्रजकडे निघाले होते.

आंबेगाव बुद्रुक परिसरात दुचाकीस्वार यश आणि त्याच्याबरोबर असलेला मित्र सार्थक यांना आरोपींनी अडवले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केले. जखमी झालेल्या दोघांना पोलिसांनी रुग्णालायत दाखल केले. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.

चाकूने गळा चिरून खुनाचा प्रयत्न

शिवीगाळ केल्याने झालेल्या वादातून एकाचा चाकूने गळा चिरून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नऱ्हे भागात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन राय रियांग असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश पवार (रा. झोलो पिनॅकल, वाल्हेकर चौक, नऱ्हे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन मधुकर खांबल (वय ४०) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन, आरोपी महेश आणि फिर्यादी सचिन नऱ्हे भागात भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन राहतात. अर्जुन आणि महेश एका वसतिगृहात सफाई कर्मचारी आहेत. सचिन या वसतिगृहात रखवालदार म्हणून काम करतो. अर्जुन आणि महेश यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद व्हायचे. अर्जुन परप्रांतातून काम करण्यासाठी आल्याने महेश त्याला टोमणे मारायचा. ‘तू बाहेरून पोट भरायला आला आहे. आम्हाला कशा शिकवितो’, असे महेशने त्याला सांगितले. या कारणावरुन ४ एप्रिल रोजी रात्री अकराच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. अर्जुनने त्याला शिवीगाळ केल्याने तो चिडला. त्यानंतर त्याने स्वयंपाकघरातील चाकूने त्याच्या गळ्यावर वार केला.या घटनेत तो गंभीर जखमी झाला. आरोपी महेश पसार तेथून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या अर्जुनला सचिनने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.