पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी मुलाखती झाल्या आहेत. या पदासाठी अद्याप अधिकृत निवड झालेली नसताना त्यापूर्वीच चर्चेतील नावावर आक्षेप घेण्यात आला आहे. राजकीय पक्ष, विद्यापीठातील संघटनांकडून संबंधितांची निवड रोखण्यासाठी आंदोलने, उपोषणे करण्यात येत आहेत.

विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने १० आणि ११ जुलै रोजी मुलाखती घेतल्या. मुलाखती होऊन दहा दिवस उलटल्यानंतरही निवड जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र एका व्यक्तीच्या नावाची सातत्याने चर्चा होत आहे. संबंधित व्यक्तीवर गंभीर स्वरुपाचे आरोप असल्याचा आक्षेप नोंदवत विरोध करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या कारभाऱ्यांनी आरोप होत असलेल्या व्यक्तीला नियुक्तीनंतर काही वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी तुमचीच राहणार, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र मुद्रांकावर देण्यास सांगितल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : ससूनमधील रुग्ण बाहेर गेला कसा? रुग्णालयात त्या रात्री नेमकं काय घडलं…

संबंधित व्यक्तीची कुलसचिव म्हणून निवड होणार असल्यास कर्मचारी संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाने दिला. युवासेनेचे शहरप्रमुख राम थरकुडे यांनी आंदोलन करून कुलसचिव निवड तातडीने जाहीर करण्याची मागणी डॉ. गोसावी यांच्याकडे केली. विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला साजेशी व्यक्ती न मिळणे ही खेदाची बाब आहे, समाजघटकांकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन विद्यापीठाने कुलसचिव पदाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. कुलसचिव पदासाठी चारित्र्य तपासण्याची गरज नाही का, असा प्रश्न युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी उपस्थित केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृतमहोत्सव साजरा करीत असताना कुलसचिवपदी निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तीची नियुक्ती झाली पाहिजे. निवड समितीने उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तपासण्याची गरज होती. मात्र, तसे झालेले नाही. त्यामुळे आक्षेपार्ह व्यक्तीची निवड केल्यास जनआंदोलन उभे करावे लागेल.

हर्ष गायकवाड, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे

हेही वाचा : पुणे: लहान मुलांमध्ये फ्लूची साथ! जाणून घ्या काय काळजी घ्यावी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी मुलाखती होऊन दहा दिवस झाले तरी निवड गोपनीय का ठेवण्यात आली आहे? विद्यापीठ निवड जाहीर करत नाही, ही कृती विद्यापीठ कायदा तरतुदीचा भंग करणारी आहे.

धनंजय कुलकर्णी, माजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ