पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करून पसार झालेल्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अटक केली. रास्ता पेठेत नुकतीच ही घटना घडली होती.
संतोषकुमार किशोरीलाल सरोज (वय २८), प्रदीपकुमार नंदकिशोर मौर्या (वय २६, दोघे रा. जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रास्ता पेठेतील एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाकडे बतावणी करून त्यांच्या खात्यातून एक हजारांची रोकड चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणाचा समर्थ पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.
तपासात मिळालेल्या माहितीनंतर सोमवार पेठ, रास्ता पेठ परिसरात विविध बँकांच्या एटीएमजवळ सापळा लावला. सरोज आणि मौर्या यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक केल्याची कबुली दिली.
यापूर्वी दोघांनी वारजे भागात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांची फसवणूक केली होती. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एटीएमच्या ज्या भागातून पैसे बाहेर येतात. तेथे आरोपींनी लोखंडी पट्टी लावली होती. पैसे न बाहेर पडल्याने ज्येष्ठ नागरिक तांत्रिक बिघाड असल्याचे समजून एटीएममधून बाहेर पडायचे. त्यानंतर आरोपी सरोज आणि मौर्या पट्टी सरकावून पैसे लंपास करायचे, अशी माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन माेरे, उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, संतोष पागार, रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, ओैचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घाेरपडे, भाग्येश यादव यांनी ही कामगिरी केली.