मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात हिरवी मिरची, फ्लॅावर, गवार या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. ढोबळी मिरची, वांग्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बाजारात उत्सवऊर्जा ; करोनानंतरच्या भीतीमुक्त वातावरणात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी झुंबड

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२८ ऑगस्ट) राज्य, तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ८ ते १० ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ टेम्पो घेवडा; तसेच ४ ते ५ टेम्पो कोबी, इंदूरहून ९ ते १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १३ ते १४ ट्रक लसूण, आग्रा, इंदूरमधून मिळून ५५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले १२०० ते १३०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ५० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

हेही वाचा – शाळकरी मुलीचा गावठी दारू विकतानाचा व्हिडिओ व्हायरल ; पोलीस उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

कोथिंबीर, शेपू, कांदापातीच्या दरात घट
मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे. कोथिंबीर, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, चुका आणि पालकाच्या दरात घट झाली आहे. अंबाडी आणि चवळईच्या दरात वाढ झाली असून चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना मागणी आहे. पुदिना, राजगिरा, मुळा या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीच्या दी़ड लाख जुडी; तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीमागे पाच रुपये, शेपू चार रुपये, चाकवत आणि चुका प्रत्येकी दोन रुपये, पालकाच्या जुडीमागे दहा रुपयांनी घट झाली आहे.


गणेशोत्सवामुळे फळांना मागणी

गणेशोत्सवामुळे फळांना मागणी वाढली आहे. फळांच्या दरात वाढ झाली आहे. डाळिंब, पेरु, पपई, लिंबू, कलिंगड, सीताफळ, खरबूज या फळांच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. चिकू, संत्री, मोसंबी, अननस या फळांचे दर स्थिर आहेत. फळबाजारात लिंबे एक ते दीड हजार गोणी, डाळिंब ४० ते ४५ टन, पपई १० ते १२ टेम्पो, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज ५ ते ६ टेम्पो, चिकू दीड हजार खोकी, सीताफळ ८ ते १० टन, संत्री १२ ते १५ टन, मोसंबी ७० ते ८० टन, पेरू ८०० ते ९०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.

शेवंती, गुलछडीची दरात वाढ
गणेशोत्सवामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. शेवंती आणि गुलछडीच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्य फुलांचे दर स्थिर असल्याची माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली. फूल बाजारात रविवारी फुलांची आवक कमी झाली. पुढील दोन दिवसांत फुलांची आवक वाढणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the wholesale fruit and vegetable market the prices of green chillies flowers increased pune print news amy
First published on: 28-08-2022 at 16:05 IST