पुणे : वारजे भागात मोकळ्या जागेत दारू पित बसलेल्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. तरुणाला बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

याबाबत धनंजय एकनाथ गुरव (वय २६, रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आदित्य अशोक मारणे (वय ३०, रा. श्रीराम कृपा अपार्टमेंट, दत्तनगर, वारजे), विकी गेंदालाल करंजाळे (वय ३०, रा. सदगुरु प्रेस्टीज, उत्तमनगर) यांना अटक करण्यात आली आहे़ त्यांच्याबरोबर असलेला साथीदार विशाल वारकड (रा. वारजे माळवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील एका बिअर बारसमोर असलेल्या मोकळ्या जागेत गुरव सोमवारी रात्री लघुशंका करण्यासाठी गेले हाेते. त्या वेळी आरोपी तेथे दारू पित बसले होते. आरोपींनी गुरव आणि मित्राला शिवीगाळ केली. आमच्यासमोर वाद का घालता? अशी विचारणा करून आरोपी मारणे याने त्याच्या हातातील बिअरची बाटली गुरव यांच्या डोक्यात मारली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी गुरव यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील शस्त्रे उगारून दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे तपास करत आहेत.